Sunday, April 14, 2013

मोबाईल, कॉमिक्स आणि पत्रकारिता


आज मोबाईल इंटरनेटच्या प्रगत तंत्रज्ञानामुळे कोणालाही बातम्या, माहिती यासाठी वर्तमानपत्र किंवा दूरदर्शन यावर अवलंबून राहण्याची गरज नाही. ‘ट्विटर’सारख्या माध्यमातून जगाच्या कोणत्याही कोपऱ्यात घडणारी घटना आपल्यापासून निव्वळ काही सेकंद दूर आहे. दोन वर्षांपूर्वी अमेरिकेत वाशिंग्टन डी.सी. जवळ झालेल्या भूकंपाची बातमी न्यूयॉर्कवासीयांना प्रत्यक्ष भूकंपाचे धक्के जाणवण्या आधीच मिळाली होती, ती ‘ट्विटर’मुळेच. अशा प्रकारे सोशल मीडियामार्फत माहिती वा बातमी देणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला ‘सार्वजनिक पत्रकार’ किंवा ‘सिटीझन जर्नलीस्ट’ म्हणता येईल. सोशल मीडियावर पोस्ट केल्या जाणाऱ्या प्रत्येक मजकुराला पोस्ट करणाऱ्या व्यक्तीचा असा विशेष दृष्टीकोन असतो. आणि त्यामुळेच असा सगळा मजकूर अधिकाधिक लोकतांत्रिक असतो.

गेली काही वर्षं जगभर सुरु असलेल्या ‘वर्ल्ड कॉमिक्स’च्या चळवळीने भारतासह इतर अनेक देशांमधील खेडोपाडीच्या लोकांना कॉमिक्सचे एक मध्यम उपलब्ध करून दिले. या उपाक्रमात एक ए४ कागद आणि एक पेन्सिल एवढ्याच वस्तूंची गरज असते. कॉमिक्स स्ट्रीप प्रमाणेच इथे कागदावर ४ समान चौकोनांमध्ये चित्र काढून आपली कथा मांडायची असते. इथे महत्व त्या चार चित्रांमधील कलेपेक्षा कथेला अधिक असते. सामान्य लोकांनी काढलेली ही चार चित्रांची कॉमिक्स गावामध्ये भित्तिपत्रकाच्या रुपात लावली जातात. या चळवळीमुळे कॉमिक्स पत्रकारितेच्या माध्यमातून लोकांना त्यांच्या दैनंदिन जीवनाशी निगडीत असलेल्या प्रश्नांना मांडण्याचा मार्ग सापडला.

अशा प्रकारे भित्तीपत्रकाच्या स्वरुपात ही कॉमिक्स एका मर्यादेपलीकडे मोठ्या जनसमुदायापर्यंत पोचवणे शक्य नाही. अशा वेळी मोबाईल सारख्या प्रगत आणि प्रचलित माध्यमाची जोड कॉमिक्स पत्रकारितेला मिळाली तर अशी कॉमिक्स कमी वेळात आणि कमी खर्चात असंख्य लोकांपर्यंत पोचवणे शक्य होईल. आज बहुतांश सगळ्या स्मार्ट-फोन्सवरून ‘व्हाईन’, ‘सिनेमाग्राम’सारखी अॅप्लीकेशन्स वापरून आपण ६ सेकंदाचे व्हिडीओज पटकन अपलोड करू शकतो. अशी अॅप्स वापरून कॉमिक्स स्ट्रीप्सचे त्यातील संवादांसह छायाचित्रण करता येऊ शकते. असे छोटे छोटे व्हिडीओज अपलोड केल्यास आपल्या कथा, आपले प्रश्न अगदी चुटकीसरशी लोकांपर्यंत पोचवता येतील.

अतिशय अल्प आर्थिक गरज असलेल्या कॉमिक्स पत्रकारितेमुळे बहुसंख्य लोक स्वतःचे प्रश्न स्वतः मांडू शकतील. आणि स्मार्ट-फोन्सच्या वाढत्या वापरामुळे बहुसंख्य लोकांपर्यंत ते प्रश्न पोचतील.  अशा प्रकारे या दोन माध्यमांचे अभिसरण येणाऱ्या काळात पत्रकारितेसाठी नक्कीच लाभदायी ठरेल. त्यातूनच लोकांचे प्रश्न सुटायला आणि धोरणांमध्ये बदल होण्याच्या प्रक्रियेला गती मिळेल.


Written for Sakaal newspaper daily(14.04.2013) LINK: मोबाईल, कॉमिक्स आणि पत्रकारिता

No comments:

Post a Comment